फोटो ०७ शीतल ०१
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेचा कारभार ज्या नगरविकास खात्याच्या अखत्यारिखाली येतो, त्या खात्याचे प्रमुख एकनाथ शिंदे शनिवारी पालिकेत आढावा बैठकीसाठी येत आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. गुरुवारी मुख्यालयाच्या आवाराच्या स्वच्छतेबरोबरच रंगरंगोटी करण्यात येत होती.
नगरविकास खाते बहुतेकदा मुख्यमंत्र्यांच्याकडेच असते. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मात्र या खात्याला पहिल्यांदाच स्वतंत्र मंत्री मिळाला आहे. महापालिकेची स्थापना होऊन बावीस वर्षांचा काळ लोटला. या काळात एकाही नगरविकास मंत्र्यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतलेली नाही. बहुतेकवेळा जिल्हाधिकारी कार्यालय अथवा शासकीय विश्रामगृहावर बैठका होत होत्या. पण, आता पहिल्यांदाच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे महापालिकेत येत आहेत. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक व नवीन बांधकाम नियमावलीचे सादरीकरण होणार आहे.
मंत्री शिंदे यांच्या स्वागताचे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. गुरुवारी महापालिकेच्या आवाराची स्वच्छता करण्यात आली. अग्निशमन दलाकडून आवारातील संरक्षण भिंत पाण्याने धुऊन घेतली. त्यानंतर या भिंतीच्या रंगरंगोटीचे काम हाती घेतले आहे. सॅनिटायझर यंत्राची दुरुस्ती करण्यात आली. प्रवेशद्वारावर शिस्तीचे पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
आयुक्त नितीन कापडणीस यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. त्यानंतर स्वच्छता व रंगरंगोटीच्या कामाची पाहणी केली. प्रतापसिंह उद्यानाकडील बाजूला स्वच्छता, पत्र्याच्या शेडवरील पालापाचोळा काढण्याच्या सूचना दिल्या. यावेळी शाखा अभियंता वैभव वाघमारे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र ताटे, अविनाश पाटणकर, नकुल जकाते, सहायक आयुक्त सहदेव कावडे उपस्थित होते.
फोटो ओळी : महापालिकेच्या आवारातील संरक्षक भिंती पाण्याच्या फवारा मारून स्वच्छ करण्यात आल्या.