लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण थांबली आहे. हे पूर्णत: चुकीचे आहे. बदल्या ऑनलाईनच होणार असल्यामुळे प्रक्रिया पूर्ण करावी आणि कोराेनाचे संकट कमी झाल्यावर आदेश द्यावेत, अशी मागणी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ जुनी पेन्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील व जिल्हाध्यक्ष अमोल माने यांनी केली आहे.
शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांच्याकडे मागण्याचे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले की, प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांच्या नवीन शासननिर्णयानुसार जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, प्रशिक्षण देणे, शाळानिहाय रिक्त जागा घोषित करणे, याद्या प्रसिद्ध करणे, शिक्षकांकडून बदलीसाठी पसंतीक्रम घेणे अशा अनेक कामांची पूर्वतयारी करणे अपेक्षित आहे. या बदल्या १ मे ते ३१ मे या कालावधीत करण्यात येतील, असे शासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे पूर्वतयारी तत्काळ सुरू होणे गरजेचे आहे.
दरम्यान, पूर्वतयारीबाबत शिक्षण विभागाला लेखी सूचना दिल्याचे डुडी यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी सरचिटणीस राहुल पाटणे, जिल्हा उपाध्यक्ष महेश चौगुले आदी पदाधिकारी उपस्थित होते.