सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे राज्य शासनाने राज्यात कोणतेही मोठे कार्यक्रम न घेण्याचे आवाहन केले असताना सांगलीत होणाऱ्या शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाचे कार्यक्रम बुधवारी जाहीर करण्यात आले. हे कार्यक्रम अचानक रद्द झाले तर खर्च व श्रम वाया जाणार असल्याने स्थानिक पातळीवर तयारीला संभ्रमाचे ग्रहण लागले आहे.महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने सर्वत्र सतर्कतेचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन टाळण्याविषयीच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्यामुळे नजीकच्या काळात मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजनावर संकट आले आहे.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी मॅरेथॉन बैठकीत विविध विभागांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील कोरोना आजाराला तोंड देण्याची तयारी, सांगलीत होऊ घातलेले शंभरावे नाट्यसंमेलन आदी विषयांचा आढावा घेतला.मंत्री पाटील नाट्यसंमेलनाचे निमंत्रक आहेत. त्यासंदर्भात नाट्यपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. निधीची उपलब्धता, कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आदी विषयांवर चर्चा झाली.
निधी उपलब्धतेसंदर्भात परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याशी चर्चा करण्यात आली. कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रम, सभा-समारंभांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे नाट्यसंमेलनावरही टांगती तलवार होती, मात्र मुंबईतून कार्यक्रम जाहीर झाल्याने गोंधळ वाढला आहे.