सांगली, दि. 25 - सांगली शहरातील प्रसिद्ध गणपती पंचायतन संस्थानच्या गणेशाची प्रतिष्ठापना शुक्रवारी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात करण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत शहरासह परिसरातील भाविकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. संस्थानच्या दरबार हॉलमध्ये गणरायाची थाटामाटात प्रतिष्ठापना करण्यात आली. श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन व कुटुंबीयांच्यावतीने विधिवत पूजा करण्यात आली.राजवाडा परिसरातील गणेशदुर्ग दरबार हॉलमध्ये सकाळी 10 वाजता श्रींची स्थापना करण्यात आली. यावेळी पानसुपारी, प्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला. प्रतिष्ठापनेवेळी विजयसिंह पटवर्धन, राजलक्ष्मीराजे पटवर्धन, अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, हिमालयराजे, जिल्हाधिकारी विजय काळम पाटील, नगरसेविका अश्विनी खंडागळे, हेमंत खडांगळे उपस्थित होते.
गणपती पंचायत संस्थानच्या गणेशोत्सवानिमित्त २२ ते ३१ ऑगस्ट या कालावधित विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (26 ऑगस्ट)सायंकाळी अंतरंग-निनाद प्रस्तुत महेश हिरेमठ व भक्ती साळुंखे यांचा मराठी व हिंदी गीतांची मैफील, रविवारी (27 ऑगस्ट )निलेश जोशी, संदीप वाडेकर यांच्या हिंदी, मराठी गाण्यांचा ‘स्वरनक्षत्र’, सोमवारी महिलांसाठी हळदी-कुंकूचा कार्यक्रम व सायंकाळी अभिषेक पटवर्धन यांचा ‘भक्तीरंग’ हा कार्यक्र्रम आयोजित केला आहे. २९ ऑगस्टला दुपारी 3 वाजता श्रींच्या विसर्जनाचा रथोत्सव सोहळा दरबार हॉलपासून सुरू होणार आहे.