गेल्या चार दिवसांपासून हवेत प्रचंड उष्णता जाणवत होती; परंतु पावसाने हुलकावणी दिली होती. अशा उष्ण वातावरणातच शुक्रवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. काही वेळातच त्याचा जोर वाढत गेला. सायंकाळी धुवाधार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.
तासगाव शहरासह मंडळातील सर्व गावांत जोरदार पाऊस झाला. मणेराजुरी व मंडळातील सावर्डे, वाघापूर, योगेवाडी, उपळावी, वाघापूर, कौलगे, लोढेसह परिसराला जवळपास तीन ते चार तास मुसळधार पावसाने झोडपले.
सावळजसह मंडलातील, अंजनी, गव्हाण, नागेवाडी, वडगाव, डोंगरसोनी, सिद्धेवाडी, दहिवडी, जरंडी, वायफळे, बिरणवाडी या गावात रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. मांजर्डेसह मंडलातील गावामध्ये मुसळधार पाऊस झाला. विसापूर मंडळातील गावातही मुसळधार पाऊस पडला. येळावी मंडळात दमदार पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे तासगाव - सावळज रस्त्यावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती.