जत : जत शहर व बिळूर परिसरात सोमवारी सायंकाळी चार वाजता वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह तुरळक पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे आंबा, द्राक्षे, बेदाणा, शेवगा, आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने चारा व पाणीटंचाई कमी होणार नसल्याने आणखी मोठ्या पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे. रात्री दहानंतर सांगली शहरातही पाऊस झाला. जत तालुक्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. उष्णता अधिक असल्यामुळे उकाडा वाढला होता. सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान आकाशात काळे ढग जमा झाले. त्यानंतर वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह सुमारे पंधरा-वीस मिनिटे तुरळक पाऊस झाला. वादळी वारे आणि पावसामुळे आंबा व शेवगा पिकांचा मोहर गळून पडला आहे, तर द्राक्षांच्या तयार घडात पाणी साचून रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेडमधील तयार होत असलेल्या बेदाण्यात पावसाचे पाणी जाऊन तो काळा पडण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. दोन गाई, म्हैस ठार रामपूर येथील मासाळ वस्तीवर चंदर गोविंद मासाळ या शेतकऱ्याच्या घरासमोरील बाभळीच्या झाडावर वीज कोसळून तीन जनावरे ठार झाली आहेत. यामध्ये दोन देशी गाई व म्हैस यांचा समावेश आहे. ही घटना सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घडली. यामध्ये एक लाखाचे नुकसान झाले आहे. मंडल अधिकारी ए. व्ही. शेटे, तलाठी आर. एच. कोरवार, कोतवाल सुभाष कोळी यांनी पंचनामा करून मदतीसाठी शासनाला अहवाल सादर केला आहे. घटनेची माहिती रामपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच मारुती पवार यांनी शासनाला कळवली आहे.
जत शहरात पावसाची हजेरी
By admin | Published: April 05, 2016 12:50 AM