जत : जत शहर व परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह तुरळक प्रमाणात पाऊस झाला. हा अवकाळी पाऊस उन्हाळी मका, ऊस, कापूस व भुईमूग या पिकांसाठी उपयुक्त आहे, तर बेदाणा व द्राक्ष या फळपिकांसाठी हानिकारक आहे.
जत शहर व परिसरात दिवसभर उकाडा जाणवत होता. ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह सुमारे दहा मिनिटे तुरळक पाऊस झाला. या पावसामुळे रबी हंगामात पीक काढून मोकळ्या झालेल्या शेतजमिनीची मशागत करता येणार आहे. लाॅकडाऊनमुळे शहरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट होता. सर्व नागरिक घरी थांबून होते. पावसामुळे दैनंदिन व्यवहारात कोणताही व्यत्यय निर्माण झाला नाही.