सांगली : शहर व परिसरात रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे अचानक वातावरणात बदल झाला असून, आगामी चार दिवस पावसाचा मुक्काम कायम राहणार आहे.
सांगली, मिरजेत रविवारी दुपारनंतर ढगांची दाटी झाली. सायंकाळी सहा वाजता पावसास सुरुवात झाली. तासभर पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात उघडीप दिली होती. चक्रीवादळामुळे पुन्हा वातावरणात बदल झाला आहे. पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी तासभर पडलेल्या पावसाने शहरातील सखल भागात पाणी साचून राहिले. गुंठेवारीत ड्रेनेजच्या कामामुळे खोदाई करण्यात आलेल्या रस्त्यांवर दलदल निर्माण झाली आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे.
चौकट
बुधवारी मुसळधार सरी
बुधवारी, दि. २९ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.