शिराळा : शिराळा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने दुपारी चारच्या दरम्यान सुमारे दीड तास वादळी वाऱ्यासह दमदार हजेरी लावली. खरीप हंगामातील धूळ वाफेतील भात पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
सांगाव, मांगले, कोकरूड, आरळा, चरण, चांदोली धरण परिसर, वाकुर्डे, अंत्री, आदी सर्व तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांनी नांगरट व कुळवट करून तण वेचून शेते पेरणीसाठी तयार केली आहेत. जून महिन्यात भात पेरणी व खरीप हंगामात सोयाबीन, मका, ज्वारी, भुईमूग पेरणी करण्यात येते. तालुक्यात मुख्य पीक भात असून, भात पिकाचे क्षेत्र १२ हजार ५५० हेक्टर आहे. भात पेरणीपूर्वी मशागतीची कामे गतीने पूर्ण झाली आहेत. खरीप हंगामातील भात, सोयाबीन, ज्वारी, मका, भुईमूग, पिकांची पेरणी करण्यासाठी शेतकरी तयारी करू लागले आहेत. तालुक्यातील पाझर तलाव, तसेच धरणांमधील पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा धोका टळला आहे.