सांगली : सांगली, मिरज परिसरासह जिल्ह्याच्या काही भागात रविवारी सायंकाळी वळीव पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह सुमारे तासभर पाऊस पडला. येत्या ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात पावसाचा मुक्काम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
सांगली शहरात सायंकाळी चारनंतर अचानक ढगांची दाटी झाली. साडेसहा वाजता पावसाला सुुरुवात झाली. साडेसात वाजेपर्यंत पाऊस सुरु होता. वादळी वारे, ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. महिनाअखरेपर्यंत हा पाऊस राहणार आहे.
पावसाने हजेरी लावल्यानंतरही जिल्ह्याच्या तापमानातील वाढ कायम राहिली. रविवारी कमाल तापमान ३९ तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. येत्या काही दिवसांत तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.
चौकट
चिखलमय रस्ते
शहरातील उपनगरांमध्ये ड्रेनेजसाठी मोठ्या प्रमाणावर खोदाई केली आहे. रस्त्यांची कामे अर्धवट असल्याने पावसामुळे हे रस्ते चिखलात रुतले. माधव नगर रोडवरील शिवोदय नगर येथील तीन रस्ते यामुळे वाहतुकीसाठी बंद झाले.