कोकरुड : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने अर्धा तास हजेरी लावल्याने परिसरातील नाले तुडुंब भरुन वाहू लागले, तर जनावरांच्या चाऱ्याचे मोठे नुकसान झाले.
आरळा, मणदूर आणि चांदोली परिसर वगळता दररोज हुलकावणी देणाऱ्या पावसाने मंगळवारी सायंकाळी शिराळा पश्चिम भागातील कोकरुड, बिळाशी, शेडगेवाडी, चरण, आरळा, मणदूर, येळापूर, मेणी, गुढे-पाचगणीसह परिसरात पाणीच पाणी केले. रोजच्याप्रमाणे मंगळवारी दुपारी प्रचंड उकाडा जाणवत होता. अचानक दुपारी दोनच्यासुमारास काही गावात पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. त्यानंतर पाऊस गेला, असे वाटत असतानाच साडेपाचच्यासुमारास वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यानंतर तब्बल अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ मुसळधार पाऊस पडल्याने नाले भरून वाहू लागले. शेतात पाणी साचले होते. पावसाळ्यात जनावरांसाठी जमा करून ठेवण्यात आलेला कडबा, पिंजर, गवत भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.