सचिन लाड - सांगली -जिल्हा मध्यवर्ती कारागृह व उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळावर स्थलांतरित करण्यासाठी या जागेचा ताबा घेण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला सादर केला आहे. यावर येत्या काही दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारागृह व आरटीओ कार्यालय कवलापुरातच होण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. येत्या चार वर्षात या दोन्ही कार्यालयांच्या इमारती पूर्णत्वास येतील. सांगली व आटपाडी याठिकाणी दोन कारागृहे आहेत. सांगलीच्या कारागृहात कच्च्या कैद्यांना ठेवले जाते. आटपाडीतील स्वतंत्रपूर येथे खुले कारागृह आहे. तिथे शिक्षा लागलेल्या कैद्यांना कुटुंबासह राहण्याची सोय आहे. सांगलीचे कारागृह सव्वादोनशे क्षमतेचे आहे. गेल्या काही वर्षात कारागृह परिसरात लोकवस्ती वाढल्याने सुरक्षा धोक्यात आली आहे. यासाठी गेल्या अनेक वर्षापासून कारागृह स्थलांतर करण्याची चर्चा सुरू होती. यासाठी दोन महिन्यांपूर्वी कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी कारागृहास भेट देऊन पाहणी केली व सुरक्षेचा आढावा घेतला. त्याचवेळी त्यांनी कारागृह स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याशी त्यांनी चर्चा करून जागा देण्याची विनंती केली होती. जागेच्या विषयावर चर्चाही झाली. या चर्चेतून कवलापूर येथील नियोजित विमानतळाची जागा पडून असल्याने, ती घेण्याचे ठरले होते. त्यानुसार कारागृहाचे अधीक्षक एम. एस. पवार यांनी महिन्यापूर्वी कवलापूर येथे जाऊन त्या जागेची पाहणी केली होती. त्यानंतर जागा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना प्रस्ताव सादर केला होता. आरटीओंचे प्रशासकीय काम सांगलीत आणि वाहनांचे नूतनीकरण, वाहन चालविण्याचा परवाना (लायसेन्स) काढण्याची परीक्षा सावळी (ता. मिरज) येथे घेतली जाते. सध्याचे कार्यालय भाडेतत्त्वावर आहे. एकाच छताखाली कार्यालय नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. दहा वर्षांपूर्वी सावळीला कार्यालय नेण्याच्या हालचाली सुरू होत्या. पण या जागेवर तेथील एका शेतकऱ्याने हक्क सांगितला. त्यामुळे हा वादाचा मुद्दा बनला. सध्या या जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ट बनले आहे. मुंबई उच्च न्यायालयात याची सुनावणी सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी जागेचा शोध सुरू ठेवला होता. जागेचा हा शोध कवलापूर येथे थांबला. नियोजित विमानतळाची दीडशे एकर जागा पडून आहे. यातील तीस एकर जागेची त्यांनी मागणी केली असून, तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी हे दोन्ही प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाला सादर केला आहे.प्रश्न सुरक्षेचा : नव्या जागेमुळे सुटणार!आरोपींना ने-आण करण्यासाठी सुरक्षिततेच्यादृष्टीने कवलापुरात कारागृहासाठी प्रशासनाने २५ एकर जागा देण्याची मागणी केली आहे. यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान, तसेच कारागृहाची इमारत बांधली जाणार आहे. कवलापूर आणि बुधगाव या दोन्ही गावांच्या मध्यभागी ही जागा आहे. कवलापूरच्या ग्रामस्थांनी येथे कारागृह बांधण्यास विरोध केला आहे. जिल्हा कारागृहात दिवसेंदिवस कच्च्या कैद्यांची संख्या वाढत आहे. त्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना कारागृह प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाढीव क्षमतेने बांधकाम होणारसध्याच्या स्थितीला पावणेचारशे कैदी आहेत. क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी झाले असल्याने कारागृह अपुरे पडू लागले आहे. आजूबाजूला लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे कवलापूरच्या जागेत तातडीने कारागृह स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. जागा मंजूर झाल्यास पुढील कामाला गती येणार आहे. नव्या जागेत कैद्यांच्या वाढीव क्षमतेचे कारागृह बांधण्याचा विचार सुरू आहे.
कारागृह, आरटीओ कार्यालयाचा प्रस्ताव सादर
By admin | Published: December 27, 2015 11:59 PM