सांगली : मराठा समाजाचे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक पातळीवर मागासलेपण असल्याने समाजाला ओबीसी आरक्षणाची आवश्यकता आहे. सध्या ओबीसीमध्ये असलेल्या कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी जिल्ह्यातील हजारहून अधिक कार्यकर्त्यांनी राज्य मागासवर्गीय आयोगासमोर आपले म्हणणे मांडले. मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता का आहे, याची मागणी करणारी सव्वा लाखांवर निवेदने आयोगासमोर सादर करण्यात आली.
मराठा समाजाच्या आरक्षणाची पडताळणी करण्यासाठी सोमवारी राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. याठिकाणी कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचेही म्हणणे आयोगातील सदस्यांनी ऐकून घेत सकारात्मक अहवाल शासनासमोर सादर करण्याचे आश्वासन पदाधिकाºयांना दिले.
सांगली जिल्ह्यातून आयोगासमोर आपले म्हणणे मांडण्यासाठी हजारहून अधिक कार्यकर्ते गेले होते. काहींनी एकत्र, तर काही नागरिकांनी स्वतंत्रपणे आरक्षणाची मागणी मांडली. मराठा समाज हा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक पातळीवर मागासलेलाच असून त्याला आरक्षणाची गरज असल्याचे मत मांडण्यात आले. यावेळी जिल्हाभरातून संकलित केलेली सव्वा लाख निवेदने सादर करण्यात आली.
राज्य मागासवर्गीय आयोगासमोर निवेदने सादर करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात मोहीम राबविण्यात आली होती. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत ही मोहीम राबविली होती. ग्रामपंचायतींचे ठराव संकलित करण्यापासून ते स्वतंत्र मागणी अर्ज भरून घेण्यासाठीही तरूणांनी काम पाहिले.
सांगली जिल्ह्यातून मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील, संभाजी ब्रिगेडचे राजेंद्र पाटील, शाहीर पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या हेमलता देसाई, शीतल मोरे, संजय देसाई, अमृतराव सूर्यवंशी, भास्कर पाटील, प्रशांत पवार, देवजी साळुंखे, रोहित इनामदार, विलास देसाई, राहुल पाटील, प्रशांत भोसले आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी एकत्र येत निवेदन सादर केले.यावेळी माजी न्यायाधीश एम. जी. गायकवाड, चंद्रशेखर देशपांडे, दत्ता सराफ, सुधीर ठाकरे, डॉ. येवले, डॉ. रोहिदास, डॉ. भूषण कर्डिले, सुवर्णा रावळ यांच्यासह सदस्य उपस्थित होते.इतरांना धक्का नकोमराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यावे, ही मागणी करत असताना, सध्या ओबीसी प्रवर्गात असलेल्या कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्रपणे आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. समाजव्यवस्थेत मराठा समाज हा आजवर मोठ्या भावाची भूमिका बजावत आला आहे. त्यामुळेच कोणाचेही आरक्षण हिरावून न घेता स्वतंत्रपणे आरक्षणाची मागणी लावून धरण्यात आली.