सांगली : जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीत खा. संजयकाका पाटील यांचे कट्टर समर्थक प्रमोद शेंडगे यांना संधी मिळाल्यामुळे त्यांची सरशी, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख गटाला एकही सभापतीपद न मिळाल्यामुळे ते बॅकफूटवर गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महाडिक, घोरपडे गटाला संधी दिल्यामुळे भाजपचे नेते सत्तेचा समतोल राखण्यात यशस्वी झाले आहेत. भाजपच्या चार सदस्यांनी मात्र नाराजी व्यक्त करुन थेट घरच गाठले. त्यामुळे सभापती निवडीत ह्यकही खुशी कही गमह्ण अशीच परिस्थिती असल्याचे दिसून आले.अडीच वर्षानंतर सभापती निवडीत नेत्यांशी एकनिष्ठ राहूनही डावलल्यामुळे भाजपचे आटपाडीचे सदस्य अरुण बालटे, जतचे सदस्य सरदार पाटील, पलूस तालुक्यातील सुरेंद्र वाळवेकर, नितीन नवले, रयत विकास आघाडीच्या वाळवा तालुक्यातील कामेरीतील सुरेखा जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संजयकाकांचे चुलते डी. के. काका पाटील हेही नेत्यांच्या भूमिकेवर नाराजच होते. पहिल्या अडीच वर्षाच्या कालावधित जि. प. अध्यक्षपद मिळाले नव्हते. यावेळी उपाध्यक्ष पदाची संधी मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. महाडिक गटाने जगन्नाथ माळी यांचे नाव प्रभावीपणे रेटल्यामुळे सुरेखा जाधव यांचे नाव मागे पडून माळींना लॉटरी लागली.सुरेखा जाधव यांनी नाराजी व्यक्त केली नसली तरी, सलग दुसऱ्यांदा संधी हुकल्याचे शल्य त्यांच्या मनामध्ये आहे. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख गटाचे आटपाडीचे सदस्य अरुण बालटे यांचा विषय समितीसाठी अर्जही भरलेला होता. दुपारी १ वाजेपर्यंत मला संधी मिळणारच, असा आत्मविश्वास त्यांना होता. पण, अखेरच्याक्षणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचा पत्ता कट केल्यामुळे त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून थेट आटपाडी गाठली.नवले, वाळवेकर हे पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील असूनही संजयकाकांचे कट्टर समर्थक आहेत. संजयकाकांनी देशमुख गटाविरोधात ज्या ज्यावेळी बंड केले, त्यावेळी नवले, वाळवेकर त्यांच्याबरोबर राहिले. भाजपच्या चार सदस्यांचा गट फुटला होता, त्यामध्येही वाळवेकर, नवले होतेच.
यामुळे सभापतीपदी दोघापैकी एकाला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण, येथेही देशमुख व संजयकाका गटाच्या राजकारणाचा त्यांना फटका बसला. बैठकीतून बाहेर पडून, त्यांनी नाराजी व्यक्त केली. संजयकाकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचे समाधान झाले नाही.