जत तालुक्यात जमिनी खरेदी-विक्रीसाठी जिरायत जमीन दोन एकर व बागायत जमीन एक एकर असे प्रमाणभूत क्षेत्र जाहीर केले आहे. जत नगरपरिषद हद्दीतील जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र हे चार एकर जिरायत व दोन एकर बागायत असे जाहीर केले आहे. यापूर्वी तुकडेबंदी कायद्यांतर्गत प्रमाणभूत क्षेत्राच्या आतील जमिनीचे गुंठेवारी खरेदी-विक्रीचे व्यवहार होत होते. परंतु, आता अशा जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना सक्षम अधिकारी व जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
एखाद्याचे सर्व्हेनंबरचे क्षेत्र दोन एकर आहे. त्यातील तुम्ही एक गुंठा, दोन गुंठा, तीन गुंठे जमीन खरेदी घेणार असाल तर त्याची दस्तनोंदणी होणार नाही. मात्र, त्याच सर्व्हेनंबरचा लेआऊट मंजूर असेल आणि त्यात दोन गुंठ्यांचे तुकडे पाडून त्याला जिल्हाधिकारी तसेच सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली असेल तर अशा मान्य लेआऊटमधील दोन गुंठे व्यवहाराची दस्तनोंदणी होणार आहे.
गेल्या काही वर्षांत जमिनीचे तुकडे करून त्याची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडेबंदी लागू आहे. तरीदेखील असे व्यवहार होत असून, त्याची दस्तनोंदणी देखील होत आहे.
चाैकट
बेकायदा व्यवहार
मध्यंतरी राज्य शासनाने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने अशा दस्ताची नोंदणी करण्याचे बंद केले होते. परंतु, जत दुय्यम निबंधक कार्यालयात मात्र इस्टेट एजंटांकडून मिळत असलेल्या मोबदल्यापोटी असे व्यवहार राजरोसपणे सुरूच होते. त्यामुळे जत शहरालगत असलेल्या ओढापात्रालगतच्या तसेच जत नगरीची ग्रामदेवता श्री यल्लमादेवी यात्रेकरिता अरक्षित असलेल्या जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार हे गुंठेवारी प्लाॅटिंग करून केले. हे सर्व व्यवहार बेकायदेशीर आहेत.