संक्रमण रोखणे हाच पर्याय असून यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या
सूचनांचे काटेकोर पालन करावे.
गावोगावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून होम क्वारंटाईन व कोरोनाबाधित बाहेर फिरत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशा सूचना खासदार संजयकाका पाटील यांनी दिल्या.
कडेगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार पाटील यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, गटविकास अधिकारी दाजी दाईगडे, राजाराम गरुड आदी उपस्थित होते.
कडेगावात कोरोनारुग्ण बाहेर फिरत आहेत. त्यांच्यावर नगरपंचायतीने काय कारवाई केली? कडेगाव ग्रामीण रुग्णालयात काही रुग्णांना बाहेरून औषधे विकत आणावयास सांगितले जाते. कडेगाव येथे स्मशानभूमीत कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी पैसे घेतले जात आहेत, आदी मुद्दे उपस्थित करून गरूड यांनी संबंधितांना धारेवर धरले. त्यावर खासदार
पाटील यांनी असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे सुनावले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा चौगुले, डॉ. आशिष कालेकर, डॉ. पौर्णिमा शृंगारपुरे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप, जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले, सुरेंद्र वाळवेकर, शांता कनुंजे, काँग्रेसचे हिम्मत देशमुख, पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे उपस्थित होते.
फोटो : प्रांताधिकारी कार्यालय कडेगाव येथे आयोजित आढावा बैठकीत बोलताना खासदार संजयकाका पाटील, प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील.