सातारा : मागील एक महिन्यापासून १०० रुपयांपर्यंत दर मिळणाºया वाटाण्याला रविवारी सातारा बाजार समितीत ३५ ते ४५ रुपये भाव मिळाला. तर दुसरीकडे वांग्याचे दर कमी झाले असून, काकडी आणि गवारचे दर तेजीत निघाले. शेतीमालाचे दर स्थिर होते.
येथील सातारा बाजार समिती आणि छत्रपती शाहू फळे व भाजीपाला मार्केटमध्ये दर रविवारी मोठ्या प्रमाणात भाजीपाला, धान्य, कडधान्ये तसेच फळे येतात. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, कोरेगाव, फलटण, जावळी तालुक्यांतून हा भाजीपाला व धान्य येते. रविवारी बाजार समितीत ज्वारीला (शाळू) क्विंटलला २ ते ३ हजार रुपये दर होता. तर संकरीतला १३०० ते १५०० रुपये तसेच घेवडा (वाघा) नवीनला ६ ते ७ हजार रुपये, काळा नवीनला २५०० ३ हजार, पांढºयाला ३५०० ते ४ हजार, घेवडा (वरुण) नवीनला ५२०० ते ५४०० रुपये क्विंटलला दर होता. हळदला क्विंटलला ७५०० ते ८५००, वाळक्या मिरचीला १२५०० ते १३५०० रुपये क्विंटलला दर होता.
भाजीपाला मार्केटमध्ये वांग्याची २३ क्विंटलची आवक झाली. वांग्याला १० किलोला दर ५० ते १५० रुपये निघाला. टोमॅटोची ७४ क्विंटल आवक होऊन दर २० ते ५० रुपये, कोबी आवक ३७ क्विंटल होऊन ३० ते ५० रुपये दर निघाला. तसेच दोडक्याची ७ क्विंटल आवक झाली तर १५० ते २५०, कारल्याची १० क्विंटल आवक होऊन दर ८० ते १०० रुपयांपर्यंत निघाला. गेल्या आठवड्याच्या तुलनेत वांग्याचे दर कमी झाल्याचे दिसून आले. बटाट्याचेही दर स्थिर होते. बटाट्याला १० किलोला ५० ते १५० रुपये मिळाले.
आल्याचे दर काहीअंशी स्थिर असल्याचे दिसून आले. रविवारी एक नंबरच्या आल्याला १० किलोस ५०० ते ५५० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीचा तिखटपणा कमी झाल्याचे आताही दिसून आले. मिरचीला १० किलोस १०० ते १८० रुपये दर मिळाला. त्या तुलनेत काकडीला दर चांगला आला. काकडीची ३ क्विंटल आवक होऊन दर १० किलोस १०० ते २०० रुपये मिळाला. गवारीही तेजीत होती. गवारची ४ क्विंटल आवक झाली. तर दर २० ते ४० रुपयांच्या दरम्यान निघाला. तसेच गाजर १० क्विंटल, शेवगा १८ आणि पावट्याची १८ क्विंटलची आवक झाली.