नरवाड (जि. सांगली) : कोरोनामुळे थंडावलेल्या खाऊच्या पानांचा व्यवसाय सध्या तेजीत आला आहे. सध्या तीन हजार पिवळ्या पानांना बाजारपेठेत ४०० ते १९०० रुपये दर मिळत आहे. यामुळे मिरज पूर्वभागातील उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुळे गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून पान व्यवसायाला मरगळ आली होती. कोरोना काळात १० कवळी (एक कवळी ३०० पानांची) पानांचा दर १५० ते २५० रुपयांपर्यंत होता. दरम्यानच्या काळात पानांचे सौदे बंद होते. मात्र पानांचे सौदे सुरू होताच खाऊच्या पानांना चांगला भाव मिळत आहे. विशेषतः पिवळ्या पानांचा भाव जादा वधारला आहे. बाजारपेठेत अशा तीन हजार पानांना सध्या ४०० ते १९०० रुपये दर मिळत आहे.
यंदा कोरोना आणि अतिवृष्टीमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. पान उत्पादक कोलमडून पडला आहे. अशावेळी दरवाढीने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे.
कोट
गेल्या १५ दिवसांपासून आवक घटल्याने मागणी वाढून पान उत्पादकांना दर मिळू लागला आहे. परिणामी स्थानिक बाजारपेठांबरोबरच सांगोला, पंढरपूर, रत्नागिरी, मालवण, फोंडा, कोल्हापूर आदी बाजारपेठा पुन्हा बहरल्या आहेत.
- शशिकांत नलवडे, पान वखारदार, बेडग
कोट
आजवर कधीही नुकसान झाले नाही, इतके कोरोनामुळे झाले आहे. सध्याचा दर किती दिवस टिकतो, यावरच शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
- बाळासाहेब लिंबीकाई, शेतकरी, नरवाड
चाैकट
शेवटच्या टप्प्यात दर
''''हत्ती गेला अन् शेपूट राहिले'''' अशी पान उत्पादकांची स्थिती आहे. कारण पाने खुडण्याचा हंगाम जून ते डिसेंबरअखेर चालतो. पानांची खुडणी केवळ १० टक्के उरली असताना, आता दर वाढला आहे.