अविनाश कोळी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : चीनने १५ दिवसांसाठी भारताकडे जाणारी मालवाहू विमानसेवा बंद केल्याने वैद्यकीय उपकरणांना दरवाढीचा शॉक बसला आहे. बहुतांश उपकरणे चीनमधून येत असल्याने कोरोना काळात या उपकरणांची टंचाईसुद्धा जाणवत आहे. भारतीय उत्पादकांनाही केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे फटका बसत असल्याने हे अवलंबित्व कमी होण्याऐवजी वाढत आहे.
चीनने भारताकडील बंद केलेली मालवाहतूक मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहणार आहे. त्यानंतरही त्यांच्या भूमिकेबद्दल संदिग्धता आहे. गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय उपकरणांच्या दरात चीनने ३५ ते ४० टक्के, तर मालवाहतुकीच्या दरात २० टक्के वाढ केल्याची तक्रार भारतातील आयातदारांनी केली आहे. त्यामुळे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ऑक्सिमीटर, डिजिटल थर्मामीटर, रक्तदाब मोजमाप यंत्र, डायग्नोस्टिक किट्स, बेबी एन्क्युबेटर व अन्य सर्व उपकरणे महाग होत आहेत. ऑक्सिमीटरचे दर मागील कोरोनालाटेवेळी ५०० ते ७०० रुपयांपर्यंत होते. आता त्यांच्या किमती १५०० ते ३००० पर्यंत वाढल्या आहेत. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व डिजिटल थर्मामीटरच्या दरातही दुप्पट वाढ झाली आहे.
भारतात वैद्यकीय उपकरणांची दरवर्षी ४२ हजार कोटींची उलाढाल होते. यातील ३२ हजार कोटींची उपकरणे आयात केलेली असतात. त्यातही चीनवरील अवलंबित्व अधिक आहे. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या काळात चीनमधून १ हजार ९९० कोटी ६० लाख रुपयांची वैद्यकीय उपकरणे आयात केली गेली. कोरोनाची दुसरी लाट तीव्र झाली असताना चीनच्या भूमिकेमुळे आता भारताला फटका बसला आहे.
चौकट
भारतीय उद्योगांना फटका
असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्रिज (एआयएमईडी) चे फोरम समन्वयक राजीव नाथ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, वैद्यकीय उपकरणांच्या बाबतील चीन व अन्य देशांवरील अवलंबित्व कमी करायचे म्हणून भारतीय उद्योगांना प्रोत्साहन देण्याची योजना आली, मात्र सतत आयात शुल्कातील कपात व त्याला मिळणारे प्राधान्य यामुळे दरांच्या पातळीवर भारतीय उपकरणे महागच ठरली. त्यामुळे त्यांच्या खपावर व पर्यायाने उद्योगावर परिणाम झाला. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करायला हवा.