संख : परतीचा दमदार पाऊस, अनुकूल हवामान व हवेतील आर्द्रता यामुळे जत तालुक्यात यावर्षी चिंचेच्या उत्पादनात वाढ झाली आहे. दर्जानुसार आठवडा बाजारात ५० ते ६० रुपयांचा दर आहे. चवीने आंबटगोड असणारी चिंच उत्पादक शेतकऱ्यांना दराने उन्हाळी बोनसचा गोड धक्का दिला आहे. उत्पादकांतून समाधान व्यक्त होत आहे.
तालुक्यातील शेतीच्या बांधावर, पाटालगत, ओढ्यालगत चिंचेच्या झाडांची संख्या निसर्गातच वाढलेली पाहण्यास मिळते. देवस्थानच्या जागेवर चिंचेची लागवड केली आहे. शासनाकडून व सामाजिक वनीकरण विभागाकडून रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी चिंचेच्या झाडांनाच प्राधान्य दिले आहे.
चिंचेला चांगला दर मिळत असल्याने मागील वर्षापासून प्रयोगशील शेतकरी चिंचेची शेतीही करत आहे. चिंचेच्या झाडाचे लाकूड मऊ व टिकाऊ असल्यामुळे फर्निचर, शेती कामाची अवजारे बनविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. या लाकडाला मोठी मागणी आहे. सध्या चिंचेच्या लाकडाला ४२५ रुपये घनफूट भाव आहे.
चौकट
बहुगुणी चिंच
चिंच चवीला आंबट असली तरी ‘भारतीय खजूर’ म्हणून तिला संबोधण्यात येते. चिंचेचा सार, कोळ, चटणी, अर्क, गर, पावडर, पन्हे, सरबत आयुर्वेदिक औषधाकरिता उपयोग होतो. खळ, पावडर, बुक्का, कुंकू निर्मितीत होते. बार्शी, सोलापूर येथे चिंचोक्यापासून खत निर्मिती करणारे कारखाने आहेत.
चौकट
चिंचेचे आयुर्वेदिक महत्त्व
चिंचेच्या १०० ग्रॅम गरांमध्ये पाणी २१ टक्के, शर्करा ६७ टक्के, प्रथिने ३ टक्के, तंतुमय ५.६ टक्के, क जीवनसत्व ३ ग्रॅम इतके प्रमाण असते. विविध विकारांमध्ये चिंचेचे आयुर्वेदिक महत्त्व आहे.
चौकट
कापड उद्योगात उपयोग
कापड उद्योगात खळ तयार करण्यासाठी चिंचोक्याचा उपयोग केला जातो. चिंचोके खरेदी करून सांगलीतील व्यापारी मुंबई, सोलापूर, इचलकरंजी, मालेगाव येथील कापड उद्योगात खळ तयार करण्यासाठी पाठविले जातात. बाजारात २० ते २५ रुपये किलो अशा विक्रमी भावाने चिंचोक्यांची विक्री आहे.
यावर्षी तासगाव बाजारात क्विंटलला चिंचेस १० हजार रुपयेचा भाव मिळाला आहे. २०१९ ला ८० रुपये प्रति किलो भाव मिळाला होता.