सांगली : सांगली ते पेठदरम्यान रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास या रस्त्याला ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सप्रेस वे’ असे नामकरण करण्याचा निर्धार शुक्रवारी रस्ता बचाव कृति समितीच्या बैठकीत करण्यात आला. तसेच सांगली-कोल्हापूर रस्त्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव देण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, महापौर यांची नावे रस्त्याला देण्यावर बैठकीत एकमत झाले. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेला 1 जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
सांगली-पेठ रस्त्यासह महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत सर्वपक्षीय कृति समितीने आंदोलन हाती घेतले आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पेठ रस्त्यावर दिवे लावण्यात आले होते. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी पंचमुखी मारुती रस्त्यावरील कष्टक-यांची दौलत येथे समितीची बैठक झाली. या बैठकीला हमाल पंचायतीचे नेते बापूसाहेब मगदूम, जिल्हा सुधार समितीचे कार्याध्यक्ष अॅड. अमित शिंदे, नगरसेवक गौतम पवार, प्रशांत पाटील मजलेकर, हेमंत खंडागळे, आसीफ बावा, स्वाभिमानीचे सचिव सतीश साखळकर, मनसेचे अमर पडळकर, आशीष कोरी, शिवसेनेचे शंभुराज काटकर, राष्ट्रवादीचे सागर घोडके, अश्रफ वांकर उपस्थित होते. बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका क्षेत्रातील रस्त्याबाबत चर्चा झाली. सांगली-पेठ हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केला जाणार आहे. तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करून नवीन रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.
महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासण्यावरही भर देण्यात आला. त्यासाठी एक जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सांगली-पेठ, सांगली- कोल्हापूर या शहराला जोडणा-या प्रमुख मार्गासह महापालिका हद्दीतील रस्त्यांची कामे हाती घेतली नाही तर नववर्षाच्या प्रारंभीच राजकीय नेत्यांची नावे या रस्त्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून महापौरांपर्यंत सा-यांचीच नावे रस्त्याला देऊन निषेध व्यक्त केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतली जाते. त्यामुळे त्याचा दर्जा राहत नाही.परिणामी ठेकेदाराच्या टक्केवारीला चाप लावून रस्त्यांची कामे दर्जेदार होण्याकडेही कृति समिती लक्ष घालणार आहे. रविवारी लाँग मार्चसांगली-पेठ रस्त्याबाबत कृति समितीच्यावतीने आंदोलन हाती घेतले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी रविवार 5 नोव्हेंबरला सांगली ते तुंगपर्यंत मोटारसायकलीवरून लाँग मार्च काढला जाणार आहे. तर इस्लामपूर कृति समितीकडून पेठ ते तुंगपर्यंत लाँगमार्च निघेल. तुंग येथे दोन्ही समिती एकत्र आल्यानंतर तिथे जाहीर सभा होणार असल्याचे सुधार समितीचे अमित शिंदे यांनी सांगितले.