लोकमत न्यूज नेटवर्क तासगाव : येथे माजी नगरसेवक मोहन अग्नू कांबळे यांच्या सांगली नाका परिसरातील बंगल्यावर कोल्हापूर विभागीय उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला. या धाडीमध्ये देशी दारूच्या सुमारे सहाशे बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी कांबळे याच्यावर बेकायदा दारूविक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तासगाव - सांगली रस्त्यावरील सांगली नाका परिसरात बुधवारी सायंकाळी उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली. माजी नगरसेवक मोहन कांबळे यांच्या बंगल्यामध्ये असलेला मोठ्या प्रमाणावर देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये एकूण ५९२ देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. ही कारवाई सुरू असताना बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, कारवाई केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल न करण्याबाबत हालचाली सुरू होत्या. उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे उत्तर देण्यात आले. मात्र उत्पादन शुल्कच्या उपविभागीय अधिकारी कीर्ती शेंडगे यांनी त्वरित गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. याबाबत एस. एस. बनसोडे यांनी फिर्याद दिली.
माजी नगरसेवकाच्या बंगल्यावर छापा
By admin | Published: June 22, 2017 12:58 AM