विटा : महाराष्ट औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयाकडून संमतीपत्र देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी सांगलीच्या लाचलुचपत विभागाने अटक केलेल्या उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी स्वाती संतोष शेंडे यांच्या विटा येथील मूळ निवासस्थानावर सातारा व सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संयुक्त पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला.
बुधवारी मध्यरात्रीपर्यंत या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेंडे यांच्या बंगल्याची तपासणी केली; मात्र या तपासणीत काही आक्षेपार्ह सापडले की नाही, याबाबत गोपनीयतेचे कारण सांगून माहिती देण्यास ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी नकार दिला.
बुधवारी सांगली येथे महाराष्ट औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे यांच्यासह सुभाष माळी व कंत्राटी लिपिक सुनील भूपाल कुरणे या तिघांना पाच हजारांची लाच घेताना सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. ही कारवाई होताच प्रशासनात खळबळ उडाली.
या प्रकरणात अटक केलेल्या स्वाती शेंडे यांचे विटा हे माहेर व सासर आहे. येथील मुंढेमळा परिसरात त्यांच्या कुटुंबियांचा टोलेजंग बंगला आहे. शेंडे यांना लाच घेताना अटक केल्यानंतर बुधवारी रात्री नऊच्या सुमारास सातारा ‘एसीबी’चे पोलीस निरीक्षक जगताप यांच्यासह कर्मचाºयांनी विटा पोलिसांच्या मदतीने शेंडे यांच्या मूळ निवासस्थानावर छापा टाकला.
यावेळी या पथकाने बंगल्याचे मोजमाप घेतले. तसेच घरातील अन्य संसारोपयोगी साहित्यांचीही नोंद घेऊन मौल्यवान वस्तू आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रांची तपासणी केल्याचे समजते. याबाबत गुरुवारी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता, या छापासत्रातील माहिती गोपनीय असल्याने ती देऊ शकत नसल्याचे पत्रकारांना सांगितले.