सांगली : पक्षीय प्रचाराचा नारळ फुटण्यापूर्वीच अधिकृत उमेदवारांनी प्रचाराचे रान उठविले आहे. सुरुवातीला महापालिका क्षेत्र वगळून अन्य १२ गावांमध्ये प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. मतदारांच्या गाठी-भेटीवर अधिक भर देण्यात येत आहे. येत्या आठवडाभरात स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्षाची प्रचार प्रारंभ सभा होणार असून, ती केवळ एक औपचारिकता ठरणार आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात सध्या महापालिका क्षेत्रासह चारही बाजूच्या छोट्या गावांचा समावेश आहे. यामध्ये नांद्रे, बिसूर, माधवनगर, बुधगाव, कर्नाळ, पद्माळे, खोतवाडी, वाजेगाव, बामणोली, इनाम धामणी, अंकली, हरिपूर या गावांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्र मोठे असल्याने याठिकाणी शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा धडाका दिसणार आहे. कॉँग्रेसचे मदन पाटील, राष्ट्रवादीचे सुरेश पाटील, शिवसेनेचे पृथ्वीराज पवार, भाजपचे सुधीर गाडगीळ यांनी ग्रामीण भागात प्रचार सुरू केला आहे. या गावांमध्ये जाऊन लोकांच्या भेटी-गाठीचा कार्यक्रम सुरू आहे. प्रत्येक पक्षामार्फत आता प्रचार प्रारंभाच्या सभेचे नियोजन सुरू आहे. राष्ट्रवादीने सभेचे नियोजन केले आहे. कॉँग्रेसच्याही सभेचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. भाजप, शिवसेनेचीही त्याबाबतची तयारी पूर्ण झाली आहे. स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत या सभा येत्या आठवडाभरात होणार आहेत. प्रचाराचा नारळ फुटण्याआधीच प्रचाराचा धुरळा उठल्याने आता सभांची केवळ औपचारिकता बाकी आहे. यंदाच्या सांगली विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे प्रचारावरही त्याचा परिणाम होत आहे. संभाजी पवार, पृथ्वीराज पवार व गौतम पवार यांनी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे कमळाऐवजी धनुष्यबाणाचा प्रचार करताना त्यांना अधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत. म्हणूनच पवार समर्थकांनी सध्या ग्रामीण भागात प्रचाराचा जोर लावला आहे. राष्ट्रवादी प्रथमच या मतदारसंघात मैदानात उतरली आहे. त्यामुळे त्यांनाही या सर्व भागात नव्याने प्रचाराची यंत्रणा राबवावी लागणार आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांना महापालिकेच्या निवडणुकीचा अनुभव होता. आता आमदारकीची निवडणूक लढविताना त्यांना मोठी यंत्रणा लावावी लागणार आहे. महापालिका क्षेत्रात या गोष्टी नंतर करता येतील, या विचाराने सर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी मतदारसंघातील ग्रामीण भागाला सध्या प्राधान्य दिले आहे. (प्रतिनिधी)
नारळ फुटण्याअगोदरच सांगलीत प्रचाराचा धुरळा
By admin | Published: September 30, 2014 12:13 AM