विटा : पुणे पदवीधर निवडणुकीवेळी महाआघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करून काम केले. त्यामुळे माझा विजय सुकर झाला. त्यात खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे योगदान आहे, असे सांगून, आगामी काळात पदवीधरांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याची ग्वाही पुणे पदवीधर मतदारसंघाचे नूतन आमदार अरुण (अण्णा) लाड यांनी दिली.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आमदार अरुण लाड यांचा कुंडल येथे सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी माजी आमदार सदाशिवराव पाटील, सांगली जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक, किरण लाड, दलितमित्र विश्वनाथ कांबळे उपस्थित होते.
यावेळी सदाशिवराव पाटील म्हणाले, पुणे पदवीधर मतदारसंघाची नुकतीच झालेली निवडणूक ही ‘न भूतो, न भविष्यती’ अशी झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केल्याने अरुणअण्णांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक म्हणाले. अरुण लाड यांच्याकडून पदवीधरांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. क्रांतिअग्रणी जी. डी. बापूंचे विचार आचरणात आणून काम करताना आगामी काळात ते पदवीधरांचे प्रश्न सभागृहात मांडून मोठ्या ताकदीने सोडवतील.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो - १६१२२०२०-विटा-एनसीपी
ओळ :
पुणे पदवीधर मतदारसंघाचे नूतन आमदार अरुण लाड यांचा खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी आमदार सदाशिवराव पाटील व कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दलितमित्र विश्वनाथ कांबळे उपस्थित होते.