सांगली : बुधगाव परिसरात पिस्तूल, तलवार आणि चाकूच्या साहाय्याने दहशत माजविणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली. संदीप आनंदा निकम (वय ३१, रा. नम्रता कॉलनी, बुधगाव, ता. मिरज) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून मोटार, पिस्तूल, तलवारीसह अन्य साहित्य असा तीन लाख ७७ हजार २०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.बेकायदा शस्त्र बाळगून दहशत माजविणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक बुधगाव परिसरात गस्तीवर होते. यावेळी संशयित निकम हा त्याच्या मोटारीतून शस्त्र घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने पाठलाग करून त्यास अडविले. यावेळी त्याच्या कमरेला पिस्तूल आढळले तर खिशात जिवंत काडतूस होते. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, चाकू मिळाला. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत घरातही काही शस्त्र ठेवल्याचे निकम याने सांगितले. त्यानुसार संदीप निकम याच्या घरातून आणखी एक पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि तलवार जप्त करण्यात आली.एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण मगदूम, मेघराज रूपनर, अरूण औताडे, कुबेर खोत, संदीप नलवडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.निकम रेकाॅर्डवरील गुन्हेगारसंशयित निकम हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर सांगली ग्रामीण, महात्मा गांधी चौक पोलिस ठाणे, जळगाव येथे मारामारी, आर्म ॲक्ट आणि अपहरणासारखे गुन्हे दाखल आहेत.
Sangli: बुधगावात बेकायदा शस्त्र बाळगून दहशत माजविणारा जेरबंद, पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
By शरद जाधव | Published: April 21, 2023 7:37 PM