सांगली : शहरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपींमध्ये गुरुवारी जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील संशयित करण रामा पाटील (रा. वाल्मीकी-आवास घरकुल, सांगली) गंभीर जखमी झाला आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.संशयित हल्लेखोर शौकत मेहबूब शेख, भाग्यराज लुकस दारला, दीपक नेताजी खोत यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कारागृहातील कर्मचारी सुबोध चंद्रकांत चव्हाण यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.करण रामा पाटील याच्याविरुद्ध जबरी चोरी, लूटमार, घरफोडीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये करण पाटीलसह चौघांच्या टोळीविरुद्ध मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. करणची टोळी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहे. त्याचबरोबर संशयित शौकत शेख, भाग्यराज लुकस यांच्यावरही मोका अंतर्गत कारवाई केली आहे. तिसरा संशयित दीपक खोत खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आहे.करकडे कारागृहातील बंदी आणि कैद्यांना चहा-नाष्टा देण्याचे काम सोपवले आहे. शौकत, भाग्यराज, दीपक यांच्याबरोबर करणचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यावरून त्यांच्यात धुसफूस सुरू होती. गुरुवारी सकाळी करण चहा-नाष्टा देत होता. तेव्हा शौकत, भाग्यराज आणि दीपक त्याच्याजवळ आले. पूर्वीच्या रागातून त्यांनी थेट करणवर हल्ला चढवला. त्याला लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. शौकतने दगडाने करणच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले.हाणामारीने इतर बंदी आणि कैद्यांमध्ये गोंधळ उडाला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत हल्लेखोरांना बाजूला केले. जखमी करण याच्यावर प्राथमिक उपचार करून शासकीय रुग्णालयात दाखल केले. कारागृह अधीक्षकांनी याची गंभीर दखल घेतली असून हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी कर्मचारी सुबोध चव्हाण यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सांगली कारागृहात कैद्यांची हाणामारी, एक जण जखमी; तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 4:49 PM