अर्जुन कर्पे ।कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी संपर्क वाढवून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशी संधान बांधल्याने, विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना लोकसभेच्या तोंडावर हा गर्भित इशाराच मानला जात आहे. या आठवड्यात पृथ्वीराज देशमुख यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील भाजपच्या काही निवडक कार्यकर्त्यांशी भेटीचा सपाटा लावला आहे. त्यामुळे खा. पाटील यांच्या गटात अस्वस्थता पसरली आहे. त्यात देशमुख यांनी अजितराव घोरपडे यांना सारथी म्हणून घेतल्याने, लोकसभेची भाजपची उमेदवारी कुणाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गत आठवड्यात ढालगावमध्ये मुस्लिम बांधवांचा इज्तेमा सुरू होता. तेथे देशमुख आणि घोरपडे यांनी सोबत जाऊन शुभेच्छा दिल्या. कवठेमहांकाळ शहरात महाशिवरात्रीचा उत्सव सुरू आहे. या ठिकाणीही या जोडगोळीने भेट दिली. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.देशमुख आणि घोरपडे यांचे पूर्वीपासून घनिष्ठ संबंध आहेत. या दोघांचेही खा. पाटील यांच्याशी राजकीय वैरत्व आहे, हे संपूर्ण जिल्हा जाणून आहे. तसेच लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जाणार की राष्ट्रवादीला, असा प्रश्न असताना, भाजपमध्येही उमेदवार बदलणार, अशी चर्चा आता सुरू आहे.
निवडणूक लोकसभेची असली तरी, राजकीय स्फोटाचा केंद्रबिंदू कवठेमहांकाळमध्ये असल्याचे आता उघड होत आहे. देशमुख आणि घोरपडे यांची वाढलेली जवळीक आणि लोकसभेच्या तोंडावर कवठेमहांकाळचा वाढलेला देशमुख यांचा संपर्क, या घडामोडीमुळे लोकसभेला देशमुख किंवा घोरपडे भाजपचे उमेदवार होणार की काय? असे झाल्यास खासदार संजयकाका पाटील काय भूमिका घेणार? याची जोरदार चर्चा आता कवठेमहांकाळ तालुक्यात सुरू आहे.‘चेक आणि मेट’चे चक्रव्यूहखा. संजयकाका पाटील यांनी गेल्या साडेचार वर्षात जिल्हा पिंजून काढून सिंचन योजनेची कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे भाजप त्यांना उमेदवारी डावलण्याचा खेळ खेळणार का, असा प्रश्न आहे. देशमुख आणि घोरपडे यांनी उघडलेली राजकीय मैत्रीची आघाडी म्हणजे खा. संजयकाका पाटील यांच्यासाठी ‘चेक आणि मेट’चे चक्रव्यूह मानले जात आहे. याची चर्चा आता कवठेमहांकाळच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.