सांगली : विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी भाजपच्या वतीने सांगलीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या उमेदवारीची सोमवारी घोषणा करण्यात आली. देशमुख यांनी दुपारी उमेदवारी अर्ज भरला. संख्याबळ पाहता, देशमुख यांची निवड निश्चित मानली जाते. या जागेची मुदत वर्षभरात संपणार आहे.गेल्या वर्षी जुलैमध्ये विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक झाली. त्यावेळी देशमुख यांना भाजपने अर्ज दाखल करण्यास सांगितले होते; पण मंत्री महादेव जानकर यांच्यासाठी त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली.१९९५ मध्ये चुलते संपतराव देशमुख यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते डॉ. पतंगराव कदम यांचा पराभव केला. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज देशमुख यांनी अपक्ष उभे राहून पतंगराव कदम यांचा पराभव केला होता. जिल्हाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भाजपची ताकद जिल्ह्यात वाढली.
पृथ्वीराज देशमुखांना विधान परिषदेची उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 5:38 AM