लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : भाजपचे माजी आमदार संभाजी पवार यांचे चिरंजीव, सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांची भाजपच्या प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी ही निवड जाहीर केली. त्यामुळे पवार पुन्हा पक्षाच्या मूळ प्रवाहात सक्रिय झाले आहेत.
संभाजी पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला होता. २०१३च्या निवडणुकीत पवार गटाला उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे पृथ्वीराज पवार यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. गेल्या काही वर्षांपासून पृथ्वीराज पवार हे भाजपमध्ये पुन्हा सक्रिय झाले होते. शेतकरी, कष्टकरी, हमाल, तोलाईदार, भाजीपाला विक्रेत्यांसह सर्वसामान्यांचा गट त्यांनी पुन्हा बांधला आहे. सर्वोदय कारखान्याच्या मालकी हक्काचा न्यायालयीन लढाही सुरू ठेवला आहे. गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी सहभाग घेतला, मात्र त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश बाकी होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना पुन्हा भाजपमध्ये सक्रिय होण्याची सूचना केली. त्यांच्यावर प्रदेश सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पृथ्वीराज पवार म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाचा विचार घेऊन आप्पांनी राजकारण केले. तोच आमचा वसा आणि वारसा आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी राज्य पातळीवर जबाबदारी दिली आहे. जिल्ह्यातील सर्वच भाजप नेते, कार्यकर्त्यांशी स्नेहभाव आहे. एकदिलाने पक्ष मजबुतीसाठी प्रयत्न करणार आहोत.