आष्टा : फारणेवाडी (ता. वाळवा) येथील शेतकरी संतोष तानाजी पाटील (वय २८) व त्यांच्या वडिलांना ढवळी (ता. वाळवा) येथील खासगी सावकार सचिन विठ्ठल पाटील याने मारहाण, शिवीगाळ करीत घर पेटवून देण्याची व जिवे मारण्याची धमकी दिली. दहा लाखांसाठी बारा लाख चाळीस हजाराची वसुली करूनही सचिन पाटील त्रास देत असल्याने संतोष पाटील यांनी आष्टा पोलिसात तक्रार दिली आहे.याबाबत आष्टा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फारणेवाडी येथील शेतकरी संतोष पाटील यांनी ढवळी येथील खासगी सावकार सचिन पाटील याच्याकडून ३ फेब्रुवारी २०२० ते २५ एप्रिल २०२० पर्यंत ८ लाख रुपये महिना १० टक्के व्याजाने घेतले. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी व्याजासह १२ लाख रुपये सचिन पाटील यास परत केले. त्यानंतर पुन्हा संतोष पाटील याने १० डिसेंबर २०२० रोजी १० टक्के व्याजाने १० लाख रुपये सचिन पाटील याच्याकडून घेतले. व्याज म्हणून १ लाख रुपये सचिन पाटील याने लगेच घेतले. उर्वरित ९ लाखापाेटी ८ जानेवारी २०२१ ते ६ एप्रिल २०२१ या दरम्यान वेळोवेळी संताेष यांनी व्याजासह १२ लाख ४० हजार रुपये परत केले. घेतलेल्या रकमेपेक्षा जादा पैसे परत करूनही आणखी रकमेची मागणी करत सचिन पाटील याने संतोष पाटील व त्याच्या वडिलांना मारहाण करीत, शिवीगाळ केली घर पेटवून देण्याची व जिवे मारण्याची धमकी दिली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत.
Sangli: खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची वसुली
By हणमंत पाटील | Published: November 25, 2023 1:41 PM