- श्रीनिवास नागे
सांगली : सहकाराला पहिले दिवस राहिले नाहीत, सहकारी संस्था कमी होत आहेत. त्यांच्या जागी खासगी संस्था काम करू लागल्या आहेत. सहकार क्षेत्राचे खासगीकरण चिंतेची बाब बनली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.
सहकार महर्षी गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता सोमवारी सांगलीत झाली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रभारी आ. एच. के. पाटील होते. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री सुरेश खाडे, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, खासदार श्रीनिवास पाटील, खा. संजय पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. डॉ. विश्वजित कदम, विद्याधर अनास्कर, आमदार मोहनराव कदम, मानसिंगराव नाईक, अरुण लाड, सुमनताई पाटील, विक्रम सावंत, जयश्री पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गुलाबराव पाटील यांच्यावर लिखित ‘सहकारतीर्थ’ जीवनचरित्राचे प्रकाशन करण्यात आले. सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्काराने सुशीलकुमार शिंदे आणि अनास्कर यांना तर, ऋणानुबंध पुरस्काराने शरद पाटील व रामभाऊ घोडके यांना गौरवण्यात आले.पवार म्हणाले, गुलाबराव पाटील यांनी संपूर्ण आयुष्य सहकारात काढून स्वतःवर कोणताही डाग लागू दिला नाही. सुरुवातीचा काळ खासगी साखर कारखान्यांचा होता, मात्र यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात वसंतदादा, गुलाबराव पाटील यांनी सहकारी कारखाने वाढवले. पण आता पुन्हा सहकारी आणि खासगी कारखाने संख्या समान आहे. खासगी क्षेत्राची वाढ सहकारासाठी चिंतेची बाब आहे.
एच. के. पाटील म्हणाले, गुलाबराव पाटील यांचा सहकार क्षेत्रातील शिक्षण आणि प्रशिक्षणाबाबत आग्रह होता.सुशीलकुमार शिंदे म्हणाले, गुलाबराव पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना माझ्या मंत्रिपदासाठी आग्रह धरला. त्यामुळे मी त्यांना विसरू शकत नाही.
अनास्कर म्हणाले, सहकारात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे, मात्र त्याला बदनामीचा शाप लागला आहे, याचे आत्मचिंतन करायला हवे. सहकार वाढवण्यासाठी आणि चुकांची पुनारावृत्ती टाळण्यासाठी प्रशिक्षणाचा आग्रह धरला पाहिजे.
तुमच्यात काही सांगता येत नाही!सुशीलकुमार शिंदे किती वेळा मुख्यमंत्री होते, असा सवाल शरद पवारांनी व्यासपीठावरील नेत्यांना केला. त्यावर ‘एकदाच’ असे शिंदेनी उत्तर दिले. बाळासाहेब थोरातांनी ते प्रदेशाध्यक्षही होते, याची आठवण पवारांना करून दिली. त्यावर शिंदे म्हणाले की, आता प्रदेशाध्यक्ष व्हायचं नाही. हा धागा पकडत पवार यांनी तुमच्यात (काँग्रेसमध्ये) काही सांगता येत नाही, अशी मिश्किल टिप्पणी केली.
खासगी साखर कारखाने वाढलेराज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर म्हणाले की, सहकारी साखर कारखान्याची संख्या २०२ वरून १०१ वर आली आहे, तर खासगी कारखाने २२ वरून ९३ वर गेले आहेत. यावर विचार व्हावा.