लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेतील कृष्णा घाट येथे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे अग्निशमन विभागाने संभाव्य पूर आपत्ती बचावकार्य प्रात्यक्षिक केले. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, प्रभाग समिती सभापती गायत्री कुळ्ळोळी उपस्थित होत्या.
दोन वर्षांपूर्वी महापुरामुळे सांगली मिरजेच्या कृष्णा नदीकाठावरील जनजीवन उद्ध्वस्त झाले. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन संभाव्य पूर परिस्थितीस तोंड देण्यास सज्ज असल्याचे महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून पुरामध्ये बचावकार्यासाठी लागणाऱ्या बोटी, लाईफ गार्ड जॅकेट यांची चाचणी घेण्यात आली. कृष्णा नदीपात्रात अग्निशमन विभागाने पुरात अडकलेल्यांच्या बोटीच्या सहाय्याने बचावाची प्रात्यक्षिके केली. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे व जवान यात सहभागी होते.
पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला महापौर दिग्विजय सूर्यवंशी व नगरसेवकांनी बोटीतून फेरफटका मारून पाहणी केली. यावेळी नगरसेवक करण जामदार, नगरसेविका संगीता हारगे, उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे, अभिजित हारगे, गजेंद्र कल्लोळी यांच्यासह अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित होते. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास बचावकार्यासाठी महापालिका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असल्याचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी व उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले.