- संतोष भिसेसांगली : अदानीच्या कंपन्यांच्या व्यवहारांची ईडीमार्फत चौकशी करावी अशी मागणी सर्व श्रमिक महासंघाच्या वार्षिक अधिवेशनात करण्यात आली. सांगलीत झालेल्या अधिवेशनाला मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित होते.
महासंघाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन झाले. काॅ. अतुल दिघे म्हणाले, वापरा आणि फेका ही नीती रद्द केली पाहिजे. कंत्राटीकरणामुळे कायम नोकऱ्यांना मुकावे लागत आहे. निवृत्त कामगारांचे, गिरणी कामगारांचे, साखर कामगारांचे प्रश्नही अनेक वर्षांपासून अनुत्तरीत आहेत. सरकारने त्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. काॅ. उदय भट यांनीही मार्गदर्शन केले.
दरम्यान, अधिवेशनात `कार्पोरेट लूट नको, सहकार बळकट करा` `विषमता, जातीयता, धर्मांधता नको, समता हवी` असे ठराव झाले. यावेळी गोपाळ पाटील, एन. एस मिरजकर, आनंदा नाईक, अशोक कदम, निवास पाटील यांनी विचार व्यक्त केले. संयोजन अशोक कदम, दीपक कांबळे आदींनी केले. जिल्हाध्यक्षपदी गोपाळ पाटील, सचिवपदी संजीव पुराणिक. खजिनदारपदी आनंदा नाईक (खजिनदार) अशी नवी कार्यकारिणी निवडण्यात आली.
आमदार, खासदारांपुढे व्यथा मांडणारदरम्यान, इपीएस पेन्शनधारकांनी पेन्शनवाढीसाठी सांगलीत स्टेशन चौकात २२ एप्रिलरोजी विशेष सभा आयोजित केली आहे. खासदार व आमदारांना तेथे बोलावून त्यांच्यासमोर व्यथा मांडणार असल्याचे गोपाळ पाटील यांनी सांगितले. सभेच्या तयारीसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बैठक बोलावण्यात आली आहे.