शरद जाधव - सांगली -जिल्ह्यात दुष्काळाने यंदा ‘हॅट्ट्रिक’ साधली असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. टंचाई परिस्थिती कायम ठेवत अवकाळीनेही धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. टंचाई परिस्थितीत वाढच होत असून, जिह्यातील ७९ गावे व ५९४ वाड्या-वस्त्यांवर ९० टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने जत आणि आटपाडी तालुक्यातील ३७ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, २५ हेक्टरवर क्षेत्राला बाधा पोहोचली असून, अंदाजे ४ लाख ५५ हजारांचे नुकसान झाले आहे. सलग तीन वर्षांपासून टंचाई परिस्थितीचा सामना करणाऱ्या जिल्ह्यात यंदाही भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. या भागात म्हैसाळ व टेंभू योजनेतून पाणी सोडण्यात आले असले तरी अजूनही या भागातील टंचाई परिस्थिती कायम आहे. जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, मिरज पूर्वभागात टंचाई असतानाच गेल्या आठवड्यात म्हैसाळ व टेंभू योजनेतून पाणी सोडण्यात आल्याने यातील काही भागाला काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. टंचाई परिस्थिती गंभीर रूप धारण करत असतानाच दुसरीकडे गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याच्या पूर्वभागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने शेकडो हेक्टरवरील फळबागा व इतर नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. गारपीट व वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या फळबागांना इजा पोहोचली आहे, तर काही बागा कोसळल्या आहेत. २८ फेबु्रवारी ते २ मार्चअखेर झालेल्या अवकाळी पावसाने ३३ टक्क्यांपेक्षा जादा नुकसान झालेल्या क्षेत्राचा अहवाल तयार करण्यात आला असून, स्थानिक पातळीवर तलाठ्यांकडून पंचनाम्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर भरपाईबाबत कार्यवाही होण्याची शक्यता आहे. या कालावधित आटपाडी तालुक्यातील ८ शेतकऱ्यांच्या ७.८० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष पिकाला अवकाळीचा फटका बसला असून, दीड लाखावर अंदाजे नुकसान झाले आहे. जत तालुक्यातील द्राक्षे १५.४० हेक्टर, डाळिंब १.१०, तर चिकू १ हेक्टर अशा १७.५० हेक्टरवरील फळबागांना नुकसान पोहोचले असून, यात ३.१५ लाखांचे नुकसान झाले आहे. टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला तर जिल्ह्यातील ७९ गावे व ५९४ वाड्या-वस्त्यांवर ९० टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील १ लाख ९९ हजार लोकसंख्या टंचाईचा सामना करत आहे. भीषण टंचाई व अवकाळीने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीत वाढ होत असताना शासनाकडून मात्र जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार सुरु आहेत. अवकाळी पावसाने जिल्हाभर थैमान घातले असताना ३३ टक्कयांच्यावर नुकसान झालेल्या क्षेत्राचेच पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पंचनाम्याबाबत कुठलाच आदेश नसल्याने शासनाकडून शेतकऱ्यांची कुचेष्टा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी पालकमंत्री दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर येणार असून, त्यांच्याकडून यावर सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.
ऐन दुष्काळात ‘अवकाळी’चे विघ्न...
By admin | Published: March 04, 2016 1:18 AM