लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आरोग्य कर्मचाऱ्यांनी गेल्या दीड वर्षात कोरोना काळात चांगली कामगिरी केली आहे. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे यापुढे वेळेवर पगार होतील. तसेच रजा, सुट्ट्या देण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत जिल्हा परिषदेत बुधवारी बैठक झाली. यावेळी सीईओ डूडी बोलत होते. यावेळी आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, विभागीय अध्यक्ष एस. एल. कुंभार, कार्याध्यक्ष शांताराम कुंभार, लक्ष्मण माने, एल. के. पाटील, नाना भोसले, शांता खोत, अरुणा धर्माधिकारी, चित्रा माने यांच्यासह आरोग्य सेविका उपस्थित होत्या. या बैठकीत संघटनेने आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. रजा, सुट्ट्या मिळाव्यात, पदोन्नतीचा प्रश्न सोडवावा, आदी मागण्या केल्या आहेत.
यावेळी जितेंद्र डूडी यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यात चांगली कामगिरी केल्यामुळेच कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणता आला आहे. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील. रजा, सुट्टया देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. कर्मचाऱ्यांचे पगार महिन्याच्या ५ तारखेपर्यंत होतील, अशी व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले.