सांगली : जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्याने रुग्णालये व खाटांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांना कोविड रुग्णालये सुरू करण्याचे आवाहन केले आहे.
खर्चाचा आराखडा तयार करून संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा करून निर्णय घेण्याची तयारी प्रशासकीय स्तरावर सुरू आहे. याशिवाय आणखी बऱ्याच अडचणींचे बांध कारखान्यांसमोर आहेत.राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनीही कारखान्यांना रुग्णालय उभारण्याबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनीही कारखाना प्रतिनिधींशी याबाबत चर्चा केली. वसंतदादा कारखान्याने यापूर्वीच रुग्णालय उभारण्याची तयारी दर्शविली असली तरी अन्य कारखान्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यांच्यासमोर सध्या अनेकप्रकारच्या अडचणी आहेत.
या अडचणींबाबत चर्चा करून संचालक मंडळाच्या बैठकीत ते निर्णय घेणार आहेत. बहुतांश कारखाना प्रतिनिधींनी आता याबाबतचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीपुढे ठेवला आहे. येत्या आठवडाभरात त्यांचे निर्णय होतील. काहींनी रुग्णालय उभारण्यास अडचणी आल्या तर आॅक्सिजन टाक्या किंवा अन्य स्वरुपात मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.