सांगली : पक्षीय उमेदवाराविरुद्ध बंड पुकारतानाच केलेली जहाल टीका आता संभाजी पवारांना अडचणीची ठरत आहे. ज्या उमेदवाराला त्यांनी गुंड व भ्रष्टाचारी म्हणून झिडकारले त्याच उमेदवाराला जिल्ह्याच्या जनतेने विक्रमी मतांनी कौल दिला. समोर असलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी स्थानिक पदाधिकार्यांसह राज्यातील काही नेतेही सरसावले आहेत. पक्षप्रवेशावेळीच संजय पाटील यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे संभाजी पवारांनी त्याला विरोध केला. त्यांच्या चारित्र्यावरही हल्लाबोल केला. त्यांचा हा विरोध अजूनही कायम आहे. पवारांची समजूत काढण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केले. तरीही पवारांनी आपली भूमिका बदलली नाही. गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर सभेत त्यांना सक्रिय होण्याचे आवाहन केले होते. आमचा शब्द पाळला तर हे उपकार कधीही विसरणार नाही, अशा शब्दात मुंडे यांनी पवारांना विनवणी केली होती. कोणत्याही प्रचार सभांना त्यांनी हजेरी लावली नाही. बचावात्मक पवित्रा म्हणून त्यांनी राजू शेट्टी यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. मात्र त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष असूनही जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीत बंडाचा झेंडा फडकविल्याने नाराजी ओढावून घेतली. पक्षीय उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार्या पदाधिकार्यांनी आता त्यांना उमेदवारी दिली जाऊ नये, यासाठी ताकद लावली आहे. त्यांच्या विरोधाने काहीही फरक पडला नाही, हे आता मतांच्या आकडेवारीतून नेत्यांना दाखविण्यात येत आहे. प्रदेशच्या काही नेत्यांमध्येही पवारांविषयी नाराजी दिसून येत आहे. मुंबईत झालेल्या एका बैठकीत स्थानिक पदाधिकार्यांच्या गटाने पवारांविषयी तक्रारीही केल्या आहेत. (प्रतिनिधी)
संभाजी पवार यांच्या अडचणी वाढल्या प्रश्न विधानसभा उमेदवारीचा : भाजपच्या स्थानिकांसह वरिष्ठांचीही नाराजी
By admin | Published: May 18, 2014 12:13 AM