मिरज : मिरज तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने मिरज पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी प्रसाद कालगावकर यांची भेट घेऊन तालुक्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. शिक्षकांच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यात येणार असल्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती मिरज तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष सुरेश नरुटे यांनी दिली.
किरण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक बँकेचे संचालक तुकाराम गायकवाड, हरिभाऊ गावडे, श्रेणिक चौगुले, आण्णासाहेब जाधव, मनोजकुमार चव्हाण, कुबेर कुंभार, सुरेश नरुटे, प्रकाश कलादगी, विकास चौगुले, सुरेश कांबळे यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली.
गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कोविड कामकाजावरील शिक्षकांच्या आदेशामध्ये योग्य त्या दुरुस्त्या करू. २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांच्या अंशदान कपात रकमा परत देण्यासाठीचे तालुक्यातील सर्व परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवू. सातवा वेतन आयोग वेतननिश्चितीची पडताळणीसाठी नियोजन, जुलैअखेर सर्व सेवापुस्तके अद्ययावत करू, सेवानिवृत्त शिक्षकांच्या गट विमा प्रस्तावांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढू, शिक्षकांचे विविध सेवाविषयक परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवू. भविष्य निर्वाह निधीसाठी जादा कपात झालेल्या रकमा परत करू, असे असल्याचे सांगितले.
तालुक्यातील शिक्षकांची प्रलंबित जवळपास एक कोटी रुपयांची बिले दिल्याबद्दल व जुलैअखेर निवृत्त होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची पेन्शनविषयक सर्व कामे पूर्ण केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विभागातील लिपिक प्रवीण कांबळे यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.