इस्लामपूर : शहरातील प्राध्यापकाच्या महाविद्यालयातील सहकाऱ्याचे फेसबुक अकाउंट हॅक करत अज्ञात भामट्याने त्यांना २५ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली. हा प्रकार १३ मे रोजी दुपारी घडला. अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणूक आणि सायबर कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत प्रा. अमित भीमराव जाधव (इस्लामपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. जाधव आष्टा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात आहेत. १३ मे रोजी ते घरी असताना महाविद्यालयातील प्रयोगशाळा सहायक अरविंद चंद्रकांत रासकर यांच्या नावाने अज्ञाताने फेसबुक अकाऊंट उघडून त्यावरून संदेश पाठवला. मित्राची मुलगी आजारी असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यासाठी २५ हजार रुपये पाठव, मी दोन दिवसांत परत करतो, अशी बतावणी त्यात केली.
जाधव यांनी लागलीच भामट्याने दिलेल्या बँक खात्यावर मोबाइलवरून फोन पेद्वारे २५ हजार रुपयांची रक्कम पाठवली. त्यानंतर त्यांनी अरविंद रासकर यांच्याशी संपर्क साधून रक्कम दिल्याचे सांगितले. यावेळी रासकर यांनी आपले फेसबुक अकाउंट कोणीतरी हॅक केले असून, आपण पैसे मागितलेले नाहीत, असे सांगितल्यावर अमित जाधव यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत अज्ञाताविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली.