सांगली : जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या सांगलीजिल्हाधिकारी पदाच्या कालावधीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम केल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली. त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन काम केल्याने कामात गतिमानता आली, अशा शब्दात कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांचा गौरव केला.माजी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांचा निरोप समारंभ आणि नूतन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास आमदार डॉ. सुरेश खाडे, नूतन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख, वि. ना. काळम यांच्या सुविद्य पत्नी जयश्री काळम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनाज मुल्ला, उपजिल्हाधिकारी विजया यादव आणि वसुंधरा बारवे, जिल्हा नियोजन अधिकारी ज. दे. मेहेत्रे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, दै. पुढारीचे आवृत्तीप्रमुख चिंतामणी सहस्रबुद्धे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.मावळते जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊन कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, वि. ना. काळम यांनी जिल्हा नियोजन समितीमधून विविध विकासकामे, आरोग्य क्षेत्रामधून सामान्य माणसाला दिलासा देणारे उपक्रम तडीस नेले.
सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन, सर्वसामान्य माणसांना आपुलकीची वागणूक देऊन, त्यांचे प्रश्न कर्तव्यदक्षपणे सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे स्थान सांगलीकरांच्या हृदयात कायम राहील, असे गौरवौद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, नूतन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. आमदार डॉ. सुरेश खाडे यांनी मनोगत व्यक्त करताना दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महोदयांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, सांगली जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, स्वयंसेवी संस्था, संघटना यांच्या सहकार्यावरच आणि कुटुंबाच्या पाठिंब्यावर आपल्या यशाची कमान उभी असल्याचे ऋणनिर्देश व्यक्त करून माजी जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, आपल्या कारकिर्दीत सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याची तळमळ घेऊन, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
महसुली कामांबरोबरच सामान्य जनतेची कामे करताना आंतरिक समाधान मिळाले. जनसेवा ही एक प्रकारे ईश्वराची सेवा मानतो. महसूल प्रशासनात काम करताना वेगाबरोबर दिशा महत्त्वाची आहे, हे ध्यानात ठेवून कर्मचारी, अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम केले. केवळ इच्छाशक्ती असणे पुरेसे नव्हे तर निर्णय निश्चयात परिवर्तीत केला तर सर्व काही साध्य होऊ शकते, या भावनेने काम केले.नूतन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालय हे जिल्हा प्रशासनाचे केंद्रबिंदू असून, सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सकारात्मक काम करून प्रशासनाची प्रतिमा कसोशीने जपावी. आपण सामान्य माणसाचे प्रश्न, समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी काम करत असतो, याचे भान ठेवून सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम करावे.
सामान्य माणसाचा त्रास कमी करण्यासाठी सर्वांनी कर्तव्य पार पाडावे. चांगले उपक्रम, सूचना यांच्या पाठीशी आपण नेहमी असू. यापुढेही सर्वांच्या सहकार्याने टीमवर्कने विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून तसेच, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्हा अग्रेसर ठेवू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.माजी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांना सांगलीकरांचे मिळालेले प्रेम हे उत्कृष्ट जिल्हाधिकारी पारितोषिकाएवढेच महत्त्वाचे आहे, असे कौतुकौद्गार व्यक्त करून नूतन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी त्यांना भावी वाटचाल व निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी मीनाज मुल्ला, पत्रकार चिंतामणी सहस्त्रबुद्धे, रवींद्र सबनीस, संप्रदा बीडकर, सुधाकर नरूले, विजय तोडकर, बबलू बनसोडे, राजू कदम, सुधीर गोंधळे, पत्रकार रवींद्र कांबळे, दीपक चव्हाण, शर्वरी पवार, शंकर देवकुळे यांनी माजी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या व आठवणी सांगितल्या. तसेच नूतन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. रुकसाना तांबोळी यांनी कविता सादर केली.सूत्रसंचालन सुधाकर नरूले आणि रुकसाना तांबोळी यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी आभार व्यक्त केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.