जत : सलग दोन-तीनवेळा निवडून येऊन राजकारणात दलाली करणाºयांना मतदारांनी घरी बसवावे व नवख्या तरुण उमेदवारांना नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन राज्याचे कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.भाजप व रासप आणि रिपाइंच्यावतीने जत नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी गांधी चौक येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्वच योजना चांगल्या आहेत. इस्लामपूर नगर पालिकेसाठी मागील सहा महिन्यात आम्ही सुमारे शंभर कोटी रुपयांचा निधी आणून विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याप्रमाणे जत नगरपालिकेसाठी निधी आणून विकास केला जाईल. परंतु जनतेने भाजपला येथे बहुमत मिळवून देणे आवश्यक आहे, असे सांगून राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की, पैशाची व सत्तेची धुंदी चढली म्हणून मतदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना सत्तेपासून लांब ठेवून घरी बसविले आहे. मागील तीन वर्षात केंद्रात व राज्यात चांगले काम चालले असून, एकाही मंत्र्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले नाहीत, असा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला.
१९९५ मध्ये युती शासनाने जत तालुक्यात म्हैसाळ योजनेच्या कामाची सुरुवात केली होती. आता ते काम पूर्णत्वास जाणार आहे, असा आत्मविश्वास मंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी व्यक्त केला. सांगली जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी शासनाने एक हजार चारशे कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. त्यामुळे जत तालुक्याच्या वंचित भागाला आता निश्चितच पाणी मिळणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
सुरुवातीस भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांनी स्वागत केले यानंतर डॉ. रेणुका आरळी, उमेश सावंत, रासपचे जिल्हा अध्यक्ष अजित पाटील, संजयकुमार सावंत, जि. प. शिक्षण सभापती तम्मणगौडा रवी-पाटील, शिवाजीराव ताड यांनी मनोगत व्यक्त केले. सरदार पाटील, विजू ताड, प्रकाश जमदाडे, बंडोपंत देशमुख, दत्ता शिंदे, दिनकर संकपाळ, अॅड. श्रीपाद आष्टेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. चंद्रकांत गुड्डोडगी यांनी आभार मानले.जत येथे प्रचार सभेत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. रवींद्र आरळी, डॉ. रेणुका आरळी, उमेश सावंत उपस्थित होते.