पुनवत : अतिवृष्टी व महापूर काळात शिराळा तालुक्यातील सागाव, कणदूर, पुनवत, खवरेवाडी, शिराळे खुर्द, फुपेरे विभागातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने काम केले आहे. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असूनही सर्व गावांमध्ये लाईन दुरुस्तीची कामे सुरू आहेत.
सागाव कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये महापुरामुळे वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असतानाही सर्व कर्मचाऱ्यांनी भरपावसात काम करत प्रत्येक गावातील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या भागातील अनेक गावांमध्ये सध्या वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी स्थनिक लोकांचे सहकार्य मिळत आहे. उर्वरित कामेही लवकर पूर्ण करून ग्रामस्थांची गैरसोय टाळू, अशी माहिती सागाव कार्यालयातून देण्यात आली.
चौकट
महावितरणची प्रचंड हानी
महापुरामुळे महावितरणची प्रचंड हानी झाली आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब, तारा, रोहित्र, फ्यूज पेट्या आदी साहित्याची नव्याने उभारणी करावी लागणार आहे. लोकांनी संयम पाळून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.