कुपवाड : शहरातील राजारामबापू हाउसिंग सोसायटीतील एका घरात चोरट्यांनी प्रवेश करत ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यात सोने, चांदीचे दागिने, दोन मोबाईल, रोख २५ हजार रुपयांचा समावेश आहे. याबाबत चिदानंद आप्पासो गव्हाणे यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
चिदानंद गव्हाणे हे एका कंपनीतील ट्रकवर चालक म्हणून काम करतात. गुरुवारी रात्री त्यांना परगावचे भाडे आल्याने आपल्या भावासह कामावर गेले होते. घरातील आई, वडील व इतर सदस्य जेवण करून झोपले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करत सोने, चांदीचे दागिने, दोन मोबाईल, रोख २५ हजार रुपये असा मुद्देमाल लंपास केला. घरात कसलातरी आवाज आल्याचे समजताच गव्हाणे यांचे वडील झोपेतून जागे झाले. त्यानंतर चोरट्यांनी पलायन केले. गव्हाणे कामावरून घरी आल्यावर शुक्रवारी सायंकाळी त्यांना वडिलांनी चोरी झाल्याचे सांगितले. यानंतर रात्री त्यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली.