सातारा : ‘जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. १०५ जणांच्या तडीपारीचे प्रस्तावही आले आहेत. मात्र, पोलिसांच्या यादीवरील अनेक आरोपी अद्याप फरार आहेत. सुरुवातीला सार्वजनिक ठिकाणी या आरोपींचे पोस्टर्स लावले जातील, त्यानंतरही ते जर सापडले नाहीत, तर त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल,’ असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.जिल्हा पोलिस दलातील वार्षिक तपासणी आणि आढावा घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून नांगरे-पाटील साताऱ्यात तळ ठोकून आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवतेज हॉलमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी खंडेराव धरणे, पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट उपस्थित होते.नांगरे-पाटील म्हणाले, ‘कऱ्हाड, पाटण, उंब्रज, शिरवळ, महाबळेश्वर, वाई आणि पोलिस मुख्यालय या ठिकाणी पोलिसांशी सुसंवाद साधता आला. पोलिसांच्या अडीअडचणी, गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यासह अनेक बाबींवर चर्चा करण्यात आली. सातारा पोलिसांचा फिटनेस चांगला असल्याचे निदर्शनास आले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सन्मवय चांगला आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही अत्यंत चांगले आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.नांगरे-पाटील म्हणाले, ‘हेडक्वॉर्टरला पोलिसांची वाहने अडकून पडत होती. ती बाहेर काढल्यामुळे (पेट्रोलिंगमध्ये वाढ) महामार्गावरील दरोड्याच्या केसेस घटल्या आहेत. २०१५ मध्ये ५ हजार १९५ घटना घडल्या होत्या. त्या २०१७ मध्ये ५ हजार १२ घडल्या. म्हणजे १८५ ने क्राईम रेट घटला आहे.’ पोलिसांच्या वसाहती आणि मुलांसाठी लवकरच सुसज्ज शाळा सुरू करण्याचा मनोदयही यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)वाहतुकीसाठी पंधरा दिवसांची मुदत !सातारा शहरातील वाहतुकीबाबत मी फार समाधानी नाही, अशी कबुली देत आयजी नांगरे-पाटील यांनी वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक घाडगे यांना येत्या पंधरा दिवसांत वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी मुदत दिली असल्याचे सांगितले.मटकेवाल्यांची ‘मैफल’सातारा जिल्ह्यात आतापर्यंत नऊजणांना तडीपार करण्यात आले असून, १०५ जणांचे तडीपारीचे प्रस्ताव आले आहेत. यात अवैध धंदे करणाऱ्यांचा समावेश आहे. मटकेवाल्यांनाही आता तडीपार केले जाणार आहे. सुरुवातीला त्यांना इशारावजा समजावून सांगण्यासाठी शुक्रवारी मटकेवाल्यांची मैफल (बैठक) बोलविल्याचाही त्यांनी टोमणा मारला.निर्भया पथकाला ७० लाखांचा निधीनिर्भया पथकाने उत्कृष्ट काम केले असून, साताऱ्यात पावणेपाच हजार कारवाया झाल्या आहेत. तसेच या पथकाने २५० हून अधिक जनजागृतीचे कार्यक्रम घेतलेले आहेत. हे चांगले काम पाहता शासनाने ७० लाखांचा निधी मंजूर केला असल्याचेही आयजी नांगरे-पाटील यांनी यावेळी सांगितले.
१०५ जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव
By admin | Published: March 01, 2017 11:38 PM