सांगली : महापालिकेने पहिल्या कोरोना लाटेवेळी सांगलीत उभारलेल्या आदिसागर मंगल कार्यालयातील कोविड सेंटरचे साडेपाच लाख रुपये भाडे अदा करण्याचा प्रस्ताव महासभेपुढे आला आहे. येत्या १२ मे रोजी महासभा होणार असून कोविड सेंटरच्या भाड्यासह नियोजन समितीच्या निधीवरून वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
महापौर दिग्वीजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली येत्या बुधवार १२ मे रोजी महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. आदिसागर सेंटरसाठी प्रती महिना एक लाख रुपयांप्रमाणे साडेपाच लाख रुपये भाडे देण्याचा विषय महासभेसमोर ठेवण्यात आला आहे. आदिसागरमध्ये कोविड सेंटर सुरू करताना ते मोफत दिले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते, मात्र आता भाडे देण्याचा विषय महासभेसमोर आल्याने यावरून वाद होण्याची शक्यता आहे.
जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेला सात कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून ६७ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामांवरून सदस्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. तब्बल ३२ नगरसेवकांचे एकही काम यामध्ये घेण्यात आले नाही. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
नगरसेवकांमध्ये यावरून असंतोष निर्माण झाला होता. हा ठरावच रद्द करावा, अशी मागणी नाराज सदस्यांनी केली होती. मात्र यावर निर्णय झाला नव्हता. आता या कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याचा विषय महासभेसमोर आला आहे. या विषयावरूनही सभेत वादळी चर्चा होण्याचे संकेत आहे.
चौकट
रस्ते दुरुस्तींसाठी ६ कोटी
कुपवाड मिरज येथे एमआयडीसी क्षेत्र आहे. याठिकाणचे अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत. जिल्हा उद्योग मित्र समितीच्या आढावा बैठकीत रस्ते दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी ५ कोटी ७५ लाख ५६ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. जिल्हा नियोजन समितीमधून हा निधी मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.