सांगली : पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेल्या सातही संशयितांनी अजून वकील न दिल्याने हा खटला लांबणीवर पडला आहे, अशी माहिती या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी गुरुवारी दिली. सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून तपासाची तसेच दाखल केलेल्या दोषारोपपत्राची सर्व माहिती घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले.सांगलीतील अनिकेत कोथळे खून खटला व हिवरे (ता. खानापूर) येथील तीन महिलांच्या खून खटल्यात निकम यांची नियुक्ती झाली आहे. या दोन्ही खटल्याच्या सुनावणीसाठी निकम गुरुवारी सांगलीत आले होते. तत्पूर्वी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, कोथळे खून खटल्यात बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सात संशयित आहेत. सध्या सर्वजण न्यायालयात कोठडीत आहेत. एकाही संशयिताने वकील न दिल्याने खटल्याची सुनावणी सुरु होऊ शकली नाही. सीआयडीचे पोलीस उपअपधीक्षक मुकूंद कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी केलेल्या तपासाची माहिती घेतली आहे.साक्षीदार किती आहेत? त्यांचे जबाब नोंदविले आहेत का? याचीही माहिती घेतली आहे. पोलीस कोठडीत संशयिताचा मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळण्याची ही पहिली घटना घडली.निकम म्हणाले, राज्यात न्यायाधिशांची संख्या कमी असल्याने प्रचंड खटले प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार न्यायाधिशांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे प्रलंबित खटल्याचा भविष्यकाळात निपटारा होईल. गुन्हेगारीत ज्या पद्धतीने वाढ होत आहे, त्यातुलनेत गुन्हेगारांना शिक्षा लागण्याचे प्रमाणही वाढले आहे. न्ययदानावर लोकांचा अजूनही विश्वास आहे. हा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी प्रलंबित खटल्यांची संख्या कमी होणे गरजेचे आहे.कोथळे कुटूंबाने घेतली भेटसंपूर्ण राज्यभरात गाजलेल्या अनिकेत कोथळे खून खटल्यात नियुक्ती झाल्यापासून उज्वल निकम पहिल्यांदाच सांगलीत आले होते. अनिकेतचा भाऊ आशीष व अमित कोथळे यांनी निकम यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. हे प्रकरण कसे घडले? याची त्यांच्याकडूनही माहिती घेतली. कोथळे बंंधूनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आम्ही लवकर न्याय द्यावा, अशी मागणी केली.खोटी गांधीगिरी करुन पाप धुतले जात नाहीमनुष्य एका पदावर गेल्यानंतर आपलं कोण काही करु शकणार नाही, असे त्याला वाटते. मग तो मनाला येईल, तसे वर्तण करतो. यातून त्यांचे वर्तण गुन्हेगारी स्वरुपाचे बनते. स्वत:ला संत समजणाऱ्यांनी गुन्हेगारी कृत्ये केली तर काय आदर्श राहणार? म्हणून आसारामबापूसारखच्या गुन्हेगारांना कडक शिक्षा होते, ते योग्यच आहे. नेता असो अथवा अभिनेता, न्याय देवता पाहत नसते. संजय दत्तला शिक्षा झाली. आता सलमान खानलही शिक्षा झाली आहे. खोटी गांधीगिरी करुन पाप धुतले जात नाही.