पाणीटाकीची सुरक्षा वाऱ्यावर
सांगली : शहराला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे, परंतु या टाकीच्या सुरक्षेसाठी प्रशासन गंभीर नसल्याचे दिसते.
मद्यपींची वर्दळ वाढली
सांगली : शहरासह उपनगरात लॉकडाऊनमध्येही दारुविक्री जोमात सुरु आहे. या ठिकाणी गर्दी असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: सायंकाळच्या सुमारास येथे मद्यपींची वर्दळ दिसून येते. कारवाईकडे पाेलिसांचे दुर्लक्ष आहे. परिसरातील अनेक मद्यपी पाेर्लात जाऊन शाैक भागवित आहेत.
तलाठी-ग्रामसेवकांच्या अनेक जागा रिक्त
जत : जत तालुक्यातील अनेक गावाला तलाठी, ग्रामसेवकच नाही. तालुक्यात महसूल विभागांतर्गत येणाऱ्या तलाठी व ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी, शेतकरी व नागरिकांची कामे खोळंबत असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील वीजखांब धोकादायक
सांगली : जिल्हाभरात अनेक गावांत अनेक ठिकाणी वाकलेले खांब असून, ताराही लोंबकळत आहेत. यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे वाकलेले वीजखांब व लोंबकळलेल्या तारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.
पशुपालन योजनांची जनजागृती करा
पलूस : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे. त्यामुळे या योजनांची जनजागृती करावी.
बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित
सांगली : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचायस्तरावर करण्याचे निर्देश शासनाने दिले असले, तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रा. पं. प्रशासनाच्या जनजागृतीअभावी ग्रामीण व दुर्गम भागातील बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित असल्याचे दिसून येते. परिणामी त्यांना शासनाच्या योजनाच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
ग्रामीण भागात गॅस एजन्सीची गरज
सांगली : वनविभागामार्फत संयुक्त वनव्यवस्थापनाचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील ९० टक्के कुटुंबांकडे गॅस आहेत. ग्रामीण भागामध्ये ग्राहकांच्या सोयीसाठी गॅस एजन्सीची गरज आहे.