लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मोटारीवर सोलापुरात झालेल्या दगडफेक घटनेचा विट्यात निषेध करण्यात आला. खानापूर तालुका भाजपच्या पदाधिकारी व आमदार पडळकर समर्थकांनी तहसीलदारांना निवेदन देऊन हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली.
ओबीसी आरक्षण मागणी घेऊन घोंगडी बैठक आंदोलनासाठी आमदार गोपीचंद पडळकर सोलापुरात गेले होते. त्यावेळी हल्लेखोराने त्यांच्या मोटारीवर मोठा दगड टाकला. परंतु, आमदार पडळकर व त्यांच्या चालकाला कोणतीही इजा झाली नाही. या घटनेचा खानापूर तालुका व विटा शहर भाजपने तीव्र निषेध केला. तालुकाध्यक्ष सुहास पाटील, माजी नगरसेवक अनिल म. बाबर, युवा मोर्चाचे पंकज दबडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विटा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात एकत्रित येऊन या घटनेचा निषेध केला.
यावेळी विक्रम भिंगारेदेवे, सुजित कदम, दिलावर मुल्ला, धीरज पाटील, दिलीप काळेबाग, नीलेश पाटील, प्रदीप माने, तुषार थोरात, आबासाहेब साळुंखे, किशोर डोंबे, परशुराम राठोड, संतोष यादव, सत्यजित पाटील, श्रीमंत मेटकरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.