सांगली : रायगडावर सहा जून रोजी ३४९ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सागरा प्राण तळमळला हे नाटक सादर केले जाणार आहे. मराठा सेवा संघाने याचा तीव्र निषेध केला असून विरोध दर्शविला आहे. राज्य शासन राज्यात दंगली घडवू पाहत असल्याचा आरोपही करण्यात आला.
संघाची मासिक बैठक रविवारी (दि. ४) सांगलीत झाली. यावेळी यावेळी डॉ. संजय पाटील, अमृतराव सूर्यवंशी, नितीन चव्हाण, श्रीरंग पाटील, संजय सावंत, प्रणिता पवार आदी उपस्थित होते. दिल्लीत महाराष्ट्र सदनामध्ये सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीमाई फुले यांचे पुतळे हटवल्याबद्दलही तीव्र निषेध यावेळी करण्यात आला.
डॉ. पाटील म्हणाले की, रायगडावर दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगळवारी (दि. ६) ३४९ वा शिवराज्याभिषेक सोहळा होत आहे. २ ते ६ जूनदरम्यान विविध कार्यक्रम होत आहेत. ६ जूनरोजी शिवराज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष सुरु होत आहे. पण शासनाने एक वर्ष अगोदरच ३५० वा सोहळा साजरा केला. जनतेला चुकीची माहिती सांगून संभ्रम निर्माण केला गेला.
सूर्यवंशी म्हणाले, सावरकरांनी शिवराज्याभिषक म्हणजे काकतालीय योग असल्याची उक्ती केली होती. कावळा बसायला आणि फांदी मोडायला गाठ पडल्याप्रमाणे शिवाजी महाराज राजे झाले असेही लिहिले आहे. महाराजांचा अपमान करणाऱ्या सावरकरांचे नाटक मुद्दाम रायगडावर सादर करण्यात येणार आहे. याबद्दल राज्य शासनाचा निषेध आहे. बैठकीला मारुती शिंदे, अर्चना कदम, आशा पाटील, युवराज शिंदे, प्रताप पाटील, देवजी साळुंखे हेदेखील उपस्थित होते.
दरम्यान, सेवा संघाच्या बैठकीत केंद्र शासनाचाही निषेध करण्यात आला. दिल्लीतील महिला पैलवानांच्या आंदोलनाला पाठींबा जाहीर केला. केंद्र सरकारने आंदोलनाकडे दुर्लक्ष करुन खासदार ब्रिजभूषणला पाठीशी घातल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.